दोन वयोवृद्धांना 'नंददीप'चा आश्रय

यवतमाळ : वयाची साठीपार केलेली वृद्ध मंडळी आर्णी महामार्गावरील तळपत्या उन्हातून पायी जात होती. संदीप शिंदे यांनी बोथबोडण फाट्यावरील प्रस्तावित निवारा केंद्रात या दोघांनाही आश्रय दिला आहे. 

शांताबाई गंगाधर दुधाटे (६५) रा देऊळगाव, परभणीबापूराव पांडू शिंदे (८१) रा. आसरा ता. आर्णी अशी या दोन वयोवृद्धांची नावे आहे. यापैकी शांताबाई ही १९ एप्रिल रोजी आर्णी महामार्गावरील जवळा ते मंगरूळ येथून पुढे अनवाणी जात होती. तर बापूराव हे २२ एप्रिलच्या दुपारी उन्हाच्या तडाख्याने भांब राजा टोल नाक्यापुढे निपचित पडून होते. शिंदे हे आपल्या जवळा येथील स्वयंसेवक संजय भालेराव, कृष्ण पवार, ओम राठोड, ज्ञानेश्वर राठोड, प्रमोद राठोड यांच्यासह जात होते. त्यांनी या वृद्धांना मदतीचा हात दिला. बोथबोडण शेतशिवारात हरिओम भूत यांच्या दातृत्वाने नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र उभारले जात आहे याठिकाणी या दोघांनाही तातडीने आसरा देण्यात आला. यापैकी शांताबाईला पुढील मानसोपचारासाठी समर्थवाडी केंद्रात हलविण्यात आले. तर बापूराव हे त्याठिकाणी आश्रयाला आहे. शांताबाईची माहिती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्याने तिच्या कुटुंबीयांचा पत्ता लागला. ती लवकरच आपल्या घरी जाणार आहे. तर बापूराव यांच्याबाबत अद्याप माहिती मिळाली नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments