भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त समता सप्ताह

यवतमाळ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहानिमित्त शिबीर, समता दिंडी व विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

समता सप्ताहाचे उद्घाटन उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य प्राजक्ता इंगळे यांच्याहस्ते झाले. यावेळी बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन उपस्थित होते. यावेळी प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्यांचा योजनांची माहिती दिली. योजना फलकाचे माहिती दालन सामाजिक न्याय भवन येथे सुरु करण्यात आले असून ते सर्वांसाठी उपलब्ध आहे. सप्ताहानिमित्त दि. 9 एप्रिल रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या अंतर्गत असलेल्या सर्व शासकीय वसतीगृहे व निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुकास्तरीय शहरी व ग्रामीण भागामध्ये समतादुतामार्फत पथनाट्य व लघुनाट्यांच्या माध्यमातुन संविधान जनजागृती करण्यात येईल. दि. 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमीत्ताने रक्तदान शिबीर व महिला उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यात महिलांना उद्योजकता या विषयाचे मार्गदर्शन  करण्यात येईल. दि. 12 एप्रिल रोजी निवासी शाळा व वसतीगृहांमध्ये संविधान जागर- भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती व संविधानाची निर्मीती याविषयी व्याख्यान आयोजिक केले आहे. दि. 13 एप्रिल रोजी समाजिक समता सप्ताह अंतर्गत कापरा येथील वस्तीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन कार्यक्रम व योजनेतील लाभार्थ्यांना साहित्य, प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. समता सप्ताहानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.

  

Post a Comment

0 Comments